काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर च्या नावावर शिक्कामोर्तब?
मुंबई: भाजपाच्या उत्तर मुंबई या बालेकिल्ल्यात काँग्रेसने बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध ऊर्मिला निवडणूक लढवणार आहे.
उत्तर मुंबईतून माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. मात्र छेडा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला. यामुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. उर्मिलाने अद्यापतरी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईऐवजी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदावर पाणी सोडत उत्तर पश्चिमची उमेदवारी मिळविली. उत्तर मुंबईतून भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते फारसे उत्सुक नसल्यामुळे एखाद्या सेलिब्रिटीला मैदानात उतरविण्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू होती.
काँग्रेसकडून माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन, राज बब्बर, गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक, अभिनेत्री नगमा, अभिनेत्री शिल्पा शिंदे, आसावरी जोशी यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र , काँग्रेस श्रेष्ठींनी या कलाकारांना डावलत उर्मिलाच्या नावावर शिक्का मोर्तब केला आहे.
