‘मी राजीनाम्याच्या देण्याच्या मनस्थितीत’ – अशोक चव्हाण
आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.
‘माझे पक्षात कुणी ऐकत नाही …, मीही राजीनाम्याच्या विचारात आहे’, अशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कथित वक्तव्याची ऑडिओक्लिप ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरात विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. बांगडे हे कमजोर उमेदवार असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनीच मान्य केलं असून त्यांना बदला अशी विनंती करण्यासाठी राजूरकर आडनाव असलेल्या कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांना फोन केला. फोनवर बोलत असताना अशोक चव्हाण यांनी ‘माझं इथं कोणी ऐकायला तयार नाही तुम्ही मुकुल वासनिक यांच्याशी बोला’ असा सल्ला या कार्यकर्त्याला दिला. कार्यकर्त्याने तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात तुम्हीच काहीतरी करू शकता असं म्हटलं असता अशोक चव्हाण यांनी ‘मीच राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे’ असल्याचं म्हटलंय.
या ऑडिओ क्लिपमुळे अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चेला आता उधाण आलाय.
