बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपाच्या कांचन कुल रिंगणात, कुल यांचं पवार कुटुंबाशी खास नातं
बारामती: बारामती लोकसभा मतदार संघात भाजपाने सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. भाजपने रासपचे महादेव जानकर यांचा पत्ता कट करून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते.
कांचन कुल आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंधदेखील आहेत. कांचन कुल यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे राणा जगजितसिंह हे कांचन यांचे चुलत बंधू आहेत. कांचन यांचा २००५ साली राहुल कुल यांच्याशी विवाह झाला. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला होता. राहुल कुल सध्या दौंडचे आमदार आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना चांगलाच फटका बसला होता. त्यातच भाजपने दौंडचे आमदार राहुल यांच्या पत्नी कांचन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंना शह दिला आहे.
