राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी, वाचा कोण आहे तो
रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात धमकीचे पत्र पोस्टाने आले होते.
बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते, मु. पो. वडगांव तांदळी, जि. अहमदनगर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची मदत घेऊन तटकरे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचे या धमकी पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रामुळे तटकरेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांनी या धमकीविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पत्रातील व्यक्तीस शोधून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांना केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रायगडमधून राष्ट्रवादी पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
