धरणालगतचा महत्त्वपूर्ण बोगदा खुला : दोन्ही कालवे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना
शिर्डी : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गती दिली गेली असून या कालव्यांसाठी धरणालगतचा महत्त्वपूर्ण आयसीपीओ बोगदा खुला करताना अकोले तालुक्यातील ० ते २८ किलोमीटर लांबीच्या कालव्याची पाहणी केली आणि उजवा व डावा कालवा जलदगतीने पूर्ण करून सोबतच २०२२ पर्यंत सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या.
निळवंडे धरण येथे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते धरणालगतचा महत्त्वपूर्ण बोगदा ब्लास्टिंग करून खुला करण्यात आला तसेच अकोले तालुक्यातील ० ते २८ लांबीच्या कामाची पाहणी मंत्री थोरात यांनी केली. यावेळी अशोक भांगरे, मीनानाथ पांडे, अमित भांगरे, विक्रम नवले, प्रदीप हासे, भानुदास तिकांडे, दादापाटील वाकचौरे, कालवा कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, मंदाताई नवले, भास्कराव आरोटे, उत्कर्षा रुपवते, परबत नाईकवाडी, पाटील बुवा सावंत, भास्करराव दराडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, भारत मुंगसे, बाळू नाईकवाडी, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने, विवेक लव्हाट, संगीता जगताप, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्यासह संगमनेर अकोले मधील विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी धरणालगत असलेल्या आयसीपीयू या महत्त्वपूर्ण बोगद्याचे ब्लास्टिंग करून कालव्यांसाठी खुले करण्यात आले. हा दुष्काळी भागासाठी अत्यंत सुवर्ण क्षण ठरला असून यावेळी मंत्री थोरात यांनी म्हाळादेवी येथील ऍक्युरेड एरिया, मेहेंदुरी, बहिरवाडी, उंचखडक खुर्द, ढोकरी, खानापूर, रेडे, सुगाव खुर्द, कुंबेफळ, कळस खुर्द तांभोळ यासह सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्ट्रक्चरल कामाची पाहणी केली.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या या धरणाच्या कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात केल्यानंतर धरणाची भिंत उभी राहिली आहे. दुष्काळी भागाला पाणी देण्याकरीता मोठमोठ्या बोगद्यांची कामेही पूर्ण करण्यात आली. गेल्या काही काळात धरणाची कामे पूर्णपणे ठप्प होती. २०१९ नंतर या कालव्यांच्या कामांना पुन्हा गती दिली. २०२२ च्या पावसाळ्यापर्यंत उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी धरणाच्या इतिहासात सर्वात जास्त ४९५ कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी देण्यात आला. या कामांसाठी निधी कमी पडणार नाही. दोन्ही कालव्यावरील विविध पूल, स्ट्रक्चरल कामे लवकरात लवकर पूर्ण करून २०२२ पर्यंत एकाच वेळेस दोन्ही कालव्याद्वारे दुष्काळग्रस्त लाभार्थीं शेतकऱ्यांना पाणी मिळेल यासाठी जलद गतीने काम सुरू आहे.
धरणाचे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतीत जाईल तोच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातील आनंदाचा दिवस ठरणार आहे. धरणालगतचा बोगदा खुला झाल्याने या धरणाच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णक्षण ठरला आहे. हे सर्व काम अंतिम टप्प्यात येते आहे हे, अत्यंत सुखदायी आहे. या सर्व कामी आजी माजी मंत्री, आमदार किरण लहामटे यांच्यासह अकोले तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हाच आपल्या जीवनाचा ध्यास असल्याचे ते म्हणाले यावेळी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांना जलदगतीने काम करावे यासाठी सूचना महसूल मंत्री थोरात यांनी केली.
मीनानाथ पांडे म्हणाले की, अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी कायम निळवंडे कालव्यांना मोठे सहकार्य केले आहे. पुनर्वासीतांचे अनेक प्रश्न मंत्रीमहोदयांनी सातत्याने सोडवले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे जे काही प्रलंबित प्रश्न राहिले आहेत ते सोडविण्यासाठी मंत्रीमहोदय प्रयत्नशील आहेत. अकोले तालुक्यातील नागरिकांना मंत्रीमहोदयांचे कायम सहकार्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिवाजी नेहे, सतीश पाचपुते अरिफ तांबोळी, सुकलाल गांगवे, रंगनाथ निर्मळ, दिनकर कडलग आदींसह कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, शेतकरी उपस्थित होते.
