सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील – आरोग्यमंत्री राजेश टोपे
जालना, दि.१२: राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, सर्वांची सहमती मिळाली तर, १५ दिवसांचा लॉकडाऊन राहू शकतो अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज जालना इथं माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे.
याबाबत टास्क फोर्स सोबत होणाऱ्या बैठकीत त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्यांचं पालन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनचा निर्णय झाला तरी तो आज किंवा उद्या तातडीनं लावला जाणार नाही, आधी त्यासाठीचं संपूर्ण नियोजन केलं जाईल आणि मगच लॉकडाऊनची घोषणा केली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात लॉकडाऊन लागलेला नाही, तर त्यावर केवळ गांभीर्यानं विचार सुरु आहे. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगारांनी घाबरू नये, आणि आपल्या गावी जायची घाई करू नये असं आवाहनही टोपे यांनी केलं.
