काँग्रेसने केली फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी
मुंबई, दि.६: काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला यंदा फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. यात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे थोडी धाडसी मागणी केली आहे.
आज सकाळी पर्यावरण मंत्र्यांना उद्देशून एक ट्विट करत तांबे म्हणाले की, “पर्यावरण मंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांना विनंती, कृपया मोठे आवाज़ करणाऱ्या व धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पध्दतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशिर्वाद देतील.”
यापूर्वीच राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, सिक्कीम, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांनी यंदा फटाक्यांवर बंदी घातली आहे. परंतू फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचं धाडस अद्याप कोणत्याच राज्याने केलेले नाही. लोकभावना तीव्र असल्यामुळे कोणतेही सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता कमीच आहे.
