केरळ विमान दुर्घटनेत १९१ पैकी १७४ प्रवाशांना वाचवण्यात यश
कोझिकोड/केरळ, दि. ७: वंदे भारत ।मोहिमेअंतर्गत आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस च्या विमानाला केरळ मधील कोझिकोड विमानतळावर अपघात झाला आहे. फार मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे येथील धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाणी होते व याच वेळी नेमकं विमान लँड होताना घसरून ५० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला असून ज्यात दोन वैमानिकही आहेत.
या विमानात एकूण १९१ प्रवासी होते. ज्यापैकी १७४ लोकांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत १२३ पेक्षा जास्त लोकं जखमी झाले असून जखमींना कोझिकोड आणि मलप्पूरम इथल्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने म्हटलंय की बोईंग ७३७ विमान दुबई ते कालिकात येत होतं. सायंकाळी बरोबर ७ वाजून ४१ मिनिटांनी रनवे क्रमांक १० वर लँड होताना हा अपघात झाला आणि विमान दोन तुकड्यात विभागले गेले. पहिल्या तुकड्याची जास्त हानी झाली. सुदैवाने आग न लागल्यामुळे यापेक्षा होणारी मोठी दुर्घटना टळली.
