जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक
पुलवामा हल्ल्यानंतर देशात दहशतवाद्यांविरोधात कठोर मोहिम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवार, (दि.२२) रोजी मध्यरात्री जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम ३५ अ वर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेते खुलेआम पाकिस्तान सरकारशी संपर्कात असल्याने काश्मीरमध्ये घडणाऱ्या सर्व घटनांची त्यांना माहिती मिळत असते. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावादी नेत्यांच्याबाबतीत कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने १८ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यासिन मलिकचाही यात समावेश होता.
यानंतर शुक्रवारी रात्री यासिनला श्रीनगर येथील माईसुमामधील घरातून अटक करण्यात आली. त्यानंतर चौकशीसाठी त्याला कोटीबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
आगामी काळात आणखी काही फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली.
