मुंबई : राष्ट्रनिर्मात्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास, स्मृतीस मी वंदन करतो. विनम्र अभिवादन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.
श्री.पवार म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणुक त्यांनी दाखवली होती. महिलांच्या सक्षमीकरणाचं काम त्यांनी त्याकाळात केलं. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले.
शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना प्रोत्साहन दिलं. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलं. अहिल्यादेवी महान राज्यकर्त्या होत्या, तितक्याच थोर विचारवंत होता, त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांच्या विचारांचं, राज्यकारभाराचं कौतुक जगभरात होत आलं आहे. यातूनच त्यांचं निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध होतं.
अहिल्यादेवींच्या शौर्य, पराक्रम, आदर्श राज्यकारभारामुळे मराठा साम्राज्याची किर्ती देशातच नव्हे तर जगभरात पोहोचली, याचंही स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी माँसाहेबांनी त्याकाळात घेतलेला प्रत्येक निर्णय व केलेलं प्रत्येक कार्य हे माझ्यासह, प्रत्येक राज्यकर्त्याला प्रेरणा, मार्गदर्शन देत राहील. मी त्यांच्या महान कार्याला, पवित्र स्मृतींना वंदन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.
