“महाराष्ट्र बचाओ आंदोलन करून कोवीड योद्ध्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम भाजपने केले” – जयंत पाटील
मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत झाली. या पत्रकार परिषदेला परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संबोधित केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देत तिन्ही मंत्र्यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याच्या बातम्या काही जणांकडून जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. खरंतर देशामध्ये कोरोनासंदर्भात सगळ्यात चांगलं काम महाराष्ट्रात सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचा महाराष्ट्रातील आकडा बराच वाढलेला असेला असा अंदाज केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला होता. मात्र राज्य सरकारने वेळीच उपाययोजना केल्या म्हणून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोवीड योद्ध्यांना भक्कम पाठिंबा देतील असं वाटलं होतं. पण ते वेळोवेळी कोरोनाशी लढा देणाऱ्यांचा अपमान करत आहेत. उलट महाराष्ट्र बचाओ आंदोलन करून कोवीड योद्ध्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम भाजपने केले. परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये स्कील नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा ठरला का? अशा तऱ्हेची वक्तव्ये करून देवेंद्र फडणवीस यांनी मराठी तरुणांचे मानसिक खच्चीकरण केले आहे, अशी टीका पाटील यांनी केली. पण आमचा आपल्या महाराष्ट्रातील तरुणांवर विश्वास असल्याचे ते म्हणाले.
भाजपने परप्रांतीय मजूरांना घरी नेले असेही फडणवीस म्हणाले, मात्र या सर्वांच्या प्रवासासाठी पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले गेले. भाजपने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक पैसा दिला नाही. राज्याला पैसा न देता केंद्राला निधी देणारा भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे का असा आता प्रश्न पडलाय, असा टोला पाटील यांनी लगावला.
कोवीड विरोधात आपण लढत असतानाच मुंबई, बीकेसी येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र केंद्र सरकारने गुजरातला हलवण्याचं काम केलं याचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला दुःख आहे, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की २८ हजार कोटी रुपये केंद्राने महाराष्ट्राला दिले, पण प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त ६६४९ कोटी रुपये मिळाले आहेत. असे असताना २ लाख ७१ हजार कोटी राज्याला मिळणार असल्याचेही फडणवीस म्हणतात, ते मिळाले तर मी त्यांचे आताच आभार मानतो, असा टोलाही यावेळी पाटील यांनी लगावला.
