CM and Tawde Job Recruitment
खुशखबर ! खुशखबर ! राज्यात १०,००१ शिक्षकांची मेगा भरती
शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज अखेर राज्य सरकारने पवित्र पोर्टलवरुन प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. यापूर्वी 2012 मध्ये शेवटची भरती घेण्यात आली होती. तब्बल सहा वर्षानंतर या शिक्षक भरतीची जाहिरात निघाल्याने अनेक तरुण-तरुणींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हि पहिलीच शिक्षक भरतीची प्रकिया होणार आहे .
महाराष्ट्रात १०,००१ जागांपैकी अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सुद्धा ही जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.
शिक्षण भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी १६ टक्के आणि खुल्या गटातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू झाल्याने सर्व संस्थांची बिंदुनामावली फेरतपासणी केल्यानंतरच या जागा भरल्या जातील. अडचणींवर मात करून अखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. राज्यातील शिक्षक भरतीवर २०१२ पासून निर्बंध घातल्याने गेल्या ६ वर्षांपासून शिक्षकांची पदे भरली गेली नाहीत. पवित्र पोर्टल मार्फत गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने आज घेतला आहे. पात्रता धारकांकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर सुरू व्हावी यासाठी राज्यभर आंदोलने केली जात होती. त्या पार्श्वभूमिवर आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली.
विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना घाबरून न जात सर्वात प्रथम पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी जेणेकरून कोणताही गोंधळ होऊ नये, कमीत कमी त्रुटी होतील याची दक्षता घ्यावी. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परीश्रम करुन काम पूर्ण केले आहे.
