‘लाव रे तो व्हिडिओ’ला ‘आता बघाच तो व्हिडिओ’ ने भाजपचे प्रतिउत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे “लाव रे तो व्हिडीओ” हे वादळ काही केल्या थांबायचे नाव घेत नसल्याचे बघताच भाजपने त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपकडून ‘बघाच तो व्हिडिओ’ ने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले जात आहे.
भाजपने मुंबईतील रंगशारदा सभागृहात जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी ‘बघाच तो व्हिडिओ’ या व्हिडिओबाबत स्पष्ट भूमिका मांडली. तसेच यावेळी भाजपकडून राज ठाकरे यांचे पूर्वीचे व्हिडिओ दाखविले. राज ठाकरे २०१४ च्या निवडणुकीत राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोलले होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. त्यावेळचे राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ आशिष शेलारानी माध्यमांना दाखवले.
राज ठाकरेंच्या ३२ प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी पण वेळेअभावी १९ प्रकरण दाखवणार असे आशिष शेलार यांनी सांगितले. असत्य आणि अर्धवट गोष्टींवर राजकारण करण्याची राज ठाकरे तुमची प्रवृती आहे. खोटं बोल पण रेटून बोल हे तुमच्याकडून महाराष्ट्र शिकतोच आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. राज ठाकरे यांना ‘मित्रा तू चुकलास’ असा इशारा ही त्यांनी दिला.
राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करण्यासाठी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राज्यभर अनेक सभांचा धडाका लावला आहे. आता त्यांच्या विरोधात भाजपने ‘आता बघाच तो व्हिडिओ’ने उत्तर दिले आहे.
