प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर चांगलेच चर्चेत आहेत. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे खेळणे आहे. आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच तुरुंगात टाकू, असे वक्तव्य करणारे प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध धमकी देणे, दहशत दाखविणे या गुन्ह्यांतर्गत फौजदारी दंडसंहितेच्या कलम ५०३, ५०६ नुसार आणि १८९ नुसार ही कारवाई करण्यात आली.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून लढत असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आंबेडकरांची बुधवारी यवतमाळ येथे प्रचारसभा झाली होती. त्या वेळी बोलताना आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती.
