Nanar-Rajapur-Refinary-Web
रत्नागिरी : कोकणात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्याचे सरकारने आहे. कोकणातील नाणार परिसरातील १५ हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने आठ हजार शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला नाणार तसेच शेजारील गावांतील ग्रामस्थानीं विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुकथनकर समिती नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प बाधित ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छिमार यांची मते जाणून घेण्यासाठी आज रत्नागिरीमध्ये दाखल झाली आहे.
सुकथनकर समितीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठराज जोशी, अभय पेठे, डॉ. श्रीरंग कद्रेकर आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा समावेश आहे.
ताजी बातमी
सुकथनकर समिती आणि रत्नागिरीतील ग्रामस्थ यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांशी बोलून झाल्यावर सुकथनकर समिती नाणार रिफायनरी प्रकल्पाचा अहवाल तयार करणार आहे.
सुकथनकर समिती समोर आपली मतं मांडण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छिमार यांना गटागटाने बोलाविण्यात येत आहे. नागरिकांना बसण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंडप घालण्यात आला असून काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
