चूक मान्य करत नाही तोपर्यंत कोणत्याच सभा, प्रचाराला जाणार नाही : युवासेना
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा नव्याने वादाला सुरुवात झाली आहे. उत्तर मध्य मुंबईच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज झााली आहे.
पूनम महाजन यांनी आपल्या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा फोटो न लावल्याने त्यांचा अपमान झाला आहे असे मत युवसेनेने व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरे हे देशाचे युथ आयकॉन आहेत. त्यांचा अपमान हा राज्यातील सर्व शिवसैनिकांचा अपमान आहे.
त्यामुळे पूनम महाजन आपली चूक मान्य करत नाहीत तोपर्यंत युवासैनिक पूनम महाजन यांच्या कुठलीही सभा आणि प्रचाराला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका युवासेनेने घेतली आहे.
तसंच पूनम महाजन यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता युवासैनिक वांद्र्यातील शाखेत एकवटणार आहेत.
युवासैनिकांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार आहे.
