‘अमोल कोल्हे यांना पाडणार’ शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आपली दुसरी यादी नुकतीच जाहीर केली आहे. अभिनेता अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र शिरूरमधील स्थनिक कार्यकत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी ‘अमोल कोल्हे यांना पाडणार आणि आम्ही आमची ताकद दाखवणार’ असे पोस्टर लावल्याने शिरूरसह राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीने विलास लांडे यांना डावलून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने शिरूरमधील स्थनिक कार्यकते पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. विलास लांडे साहेबांनी अडचणीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार, कोल्हेना पाडणार, असे मजकूर लिहीलेले पोस्टर सध्या शिरूरमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, निवडणूकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनमधील नाराजी अमोल कोल्हे यांना डोके दुखी ठरणार असल्याची शक्यता आहे.
