२० एप्रिलपासून सायन उड्डाणपूल दोन महिने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार
मुंबई: सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त लागला असून, २० एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यापुढील दोन महिने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
सायन उड्डाणपुलाचा प्लास्टरचा भाग कोसळल्याने खबरदारी म्हणून गुरुवारी रात्रीपासून पुलावर जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी या पुलाची पुन्हा पाहणी केली. मुख्य उड्डाणपुलाचा कुठलाही भाग खराब झालेला नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे.
पुलावरील १७० बेअरिंग नादुरुस्त झाले असून, ते बदलण्याचे काम २० एप्रिलपासून सुरु होणार आहे. खबरदारी म्हणून वाहतूक पोलिसांकडून जड वाहनांना पुलावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुलाखाली प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, ही कोंडी रोखण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
