‘यास’ चक्रीवादळ अखेर सक्रिय; ४८ तासात उत्तर ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता
अंदमान निकोबार बेटांनजिक तयार झालेल्या तीव्र न्यूनदाबाच्या पट्ट्याचं आज पहाटे ‘यास’ नावाच्या चक्रीवादळात रुपांतर झालं आहे.
ताशी ४ किलोमीटरच्या गतीनं ओडिशाच्या किनार्या्कडे वाटचाल करत असलेलं हे वादळ दुपारी १२ वाजता बंगालच्या उपसागरावर, ओडिशातल्या पाराद्वीप बंदरापासून ५३० तर पश्चिम बंगाल मधल्या दिघा बंदरापासून ६२० किलोमीटर अंतरावर होतं. वादळाची स्वतःभोवती फिरण्याची गती सध्या ताशी ७० ते ८० किलोमीटर आहे. आज दिवसभरात ही गती ताशी ११० ते १२० किलोमीटर पर्यंत वाढून त्याचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल.
उद्या वादळाच्या घोंगावण्याची गती ताशी १४५ ते १५५ किलोमीटरपर्यंत वाढवत वादळ अतितीव्र स्वरूप धारण करेल. २६ तारखेला पहाटे यास वादळ उत्तर ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा देईल तेव्हा त्याची घोंगावण्याची गती ताशी १५५ ते १६० किलोमीटर पर्यंत वाढलेली असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान २१ तारखेलाच अंदमानच्या परिसरात दाखल होऊन २२ तारखेपर्यंत श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत मजल मारणारे मोसमी वारे या वादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरच उत्तरेकडे खेचले गेले. त्यामुळे त्यांची केरळच्या दिशेनं अपेक्षित आगेकूच तूर्तास थांबली आहे.
