‘या’ कारणामुळे यंदाचा हिवाळा अधिक कडाक्याचा असेल, असा हवामान खात्याचा अंदाज
नवी दिल्ली, दि.१५: हवामानाच्या “ला निना” परिस्थितीमुळे या वेळचा हिवाळा अधिक कडक्याचा असेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली. थंडीची लाट येण्यामागे “अल निनो” आणि “ला निना” ही हवामानविषयक परिस्थिती प्रामुख्यानं कारणीभूत असते, असंही ते म्हणाले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीनं दरवर्षी मृत्यु ओढवतात. हवामान खात्याकडून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतल्या थंडीच्या मौसमाचा अंदाज नोव्हेंबर महिन्यात व्यक्त केला जातो.
