छत्रपती संभाजीनगर दौर्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
मुंबई, दि. ३०: शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास एक वर्ष उलटलं. या काळात काही मोजक्या लोकप्रतिनिधींच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. राजकीय निरीक्षकांनी सुरुवातीला अनुमान लावल्या प्रमाणे हे मंत्रिमंडळ जम्बो मंत्रिमंडळ होईल व यात बंडखोरी केलेल्या शिवसेनेतील ४० पैकी २० आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी अटकळ होती. परंतू तसे झाले नाही. आज अखेर छत्रपती संभाजीनगर दौर्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याची घोषणा माध्यम प्रतिनिधींसमोर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते काल रात्री दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्याविषयी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्यासंबंधी माध्यमांनी प्रश्न विचारले असता राज्याशी निगडीत विविध मुद्यांवर त्यांचा हा दौरा होता अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मंत्रीमंडळ विस्ताराची नेमकी तारीख आणि अधिक माहिती सांगायला त्यांनी नकार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले. याआधी आठवडाभरात हा विस्तार होईल असा दावा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केला. मंत्रिमंडळ विस्तार होताना त्यात कोणाकोणाची मंत्रिपदी वर्णी लागते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.
