ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक आणि गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे 8 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत निधन झाल्याची माहिती त्यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी बुधवारी रात्री दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून दिली. विष्णू वाघ हे ऑगस्ट 2016 पासून ब्रेन स्ट्रोक मुळे आजारी होते.
विष्णू वाघ यांच्या निधनाने मराठी व कोंकणी साहित्यिक विश्वाला व राजकीय क्षेत्रालाही धक्का बसला आहे.
वाघ हे 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून येऊन प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यावेळपासून ते व्हीलचेअरला खिळून होते.
विष्णू वाघ हे दोन महिन्यापासून दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये होते. वारंवार आजारी होऊ लागल्याने वाघ यांच्या इच्छेनुसार त्यांना केपटाऊन, जोहान्सबर्ग येथे नेण्यात आले होते. विष्णू वाघ यांनी 8 फेब्रुवारी रोजी केपटाऊन मध्ये अखेरचा श्वास घेतला. येत्या दोन दिवसांत त्यांचा मृतदेह गोव्यात आणला जाणार आहे. त्यानंतर तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.