Vishal Patil sangali
सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणार विशाल पाटील
सांगली: सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर कोणत्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करायचा याबद्दल सुरू असलेला घोळ आज, (दि.३०) संपला. अखेर सांगली येथून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्या वतीने ते मैदानात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ते २ एप्रिलला अर्ज भरतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विशाल पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा आज, दुपारी ३ वाजता प्रतिक पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्याकडून केली गेली. विशाल पाटील हे स्वाभिमानीचे उमेदवार असतील, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. वसंतदादा घराण्यातील व्यक्ती प्रथमच काँग्रेस सोडून अन्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. राजकीयदृष्ट्या ही घटना महत्त्वपूर्ण बनली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे संजय पाटील, वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश शेंडगे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे सांगलीची ही लढत आता राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.
