…..असा झाला गुंड विकास दुबे चा एन्काऊंटर
कानपूर: मध्य प्रदेश येथील महाकाली मंदिरा बाहेर पकडला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे आज पहाटे कानपुर येथे उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’ सोबत झालेल्या एन्काऊंटर मध्ये मारला गेला आहे. कानपूरच्या चौबेपुर येथील बिकरू गावात डीएसपी सहित आठ पोलिसांच्या हत्येत विकास दुबे मुख्य आरोपी होता. आज झालेल्या चकमकीत दुबे ला दोन गोळ्या लागल्या, एक छातीत तर दुसरी कमरेला लागली.
या घटनेबाबत खुलासा देताना एसएसपी दिनेश कुमार म्हणाले की, “विकास दुबे ला ज्या वाहनांतून आणण्यात येत होते त्या वाहनांच्या मागे काही गाड्या या प्रवासात पाठलाग करत होत्या. याच कारणासाठी गाडी वेगात पाळवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गाडी अचानक पलटी झाली. याच वेळी या परिस्थितीचा फायदा घेत विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्नात होता.”
पुढे हे अधिकारी म्हणाले की, “एसटीएफ जवान या गाडीच्या मागेच होते. त्यांनी परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कॉम्बिन्ग ऑपरेशन ला सुरुवात केली. यावेळी गोळीबार झाला आणि आत्मसंरक्षण करताना त्यांनी विकास दुबे वर गोळी चालवली, ज्यात तो मारला गेला.”
या चकमकीबाबत स्पष्टीकरण देताना एसएसपी म्हणाले की ‘एन्काऊंटर’ सारखी कोणती गोष्ट नसते. आम्ही न्यायिक प्रक्रियेचे पालन करतो. आणि आता आम्ही विकास च्या गँग मधले जेवढे गुंड आहेत त्यांनाही अटक करणार आहोत. गुंड विकास दुबे च्या एन्काऊंटर मुळे गेल्या दोन दशक त्याने माजवलेल्या दहशतीचा अंत झाला असे म्हणायला हरकत नाही.
