शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका
मुंबई/नवी दिल्ली, दि. २१: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना आहे आणि त्यांनाच शिवसेना हे पक्षाचं नाव तसंच धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे. ठाकरे गटातर्फे वरिष्ठ अॅडव्होकेट कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर बाजू मांडत ही याचिका तातडीनं सुनावणीसाठी घ्यावी, अशी विनंती आज केली. त्यावर सरन्यायाधीशांनी उद्या सुनावणी घेण्याचं मान्य केलं. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांची संस्थात्मक ताकद न आजमावता विधिमंडळ आणि संसदेतल्या संख्याबळावरून आदेश दिला. विधानसभेत शिंदे गटाचे ४० तर उद्धव ठाकरे गटाचे १५ सदस्य आहेत. लोकसभेतही शिवसेनेच्या १८ सदस्यांपैकी १३ सदस्य शिंदे गटाचे तर फक्त ५ उध्दव ठाकरे गटाचे सदस्य आहेत. आता सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवणार की ठाकरे गटाला दिलासा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
