निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार
मुंबई, दि. २०: केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करुन लोकशाही प्रक्रियेतून निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना भवनात समर्थकांची बैठक घेतल्यानंतर ते माध्यमांना संबोधित करत होते. पक्षांकडून लोकशाहीची अपेक्षा करायची आणि निवडणुक आयुक्तांची नेमणूक थेट करायची ही कुठली लोकशाही, असा सवाल त्यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्याकडून आशा असल्याचं ते म्हणाले. घटनाक्रमानुसार आधी अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल यावा. त्यानंतर पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्हाचा निकाल यायला हवा होता अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार आम्ही कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्र सादर केली. मात्र ती आयोगानं गृहित धरली नाही. जर निवडून आलेल्या प्रतिनिधींनुसारच निकाल द्यायचा होता तर आधी त्यांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर निकाल येऊ द्यायला हवा होता असं ते म्हणाले. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह चोरणं हा पूर्व नियोजित कट होता. यासारखी परिस्थिती देशातल्या इतर कोणत्याही पक्षावर येऊ शकते, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगानं शिंदे यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. आमचा गटाचा त्यांच्या गटाशी संबंध नाही. त्यामुळं त्यांचा व्हिप आम्हाला लागू होणार नाही असा दावा त्यांनी केला.
Source – AIR
