मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका
मुंबई, दि. २८: पूजा चव्हाण या युवतीने काही दिवसांपूर्वी पुणे येथे इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली. यानंतर वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात विरोधकांनी घेतल्यावर आज अखेर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर टीका करत देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेलाही प्रत्युत्तर दिले.
पहा नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले
● संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे व तो स्वीकारलेला आहे. तसेच, या प्रकरणी नि:पक्षपाती चौकशीचे व तपासाचे आदेश दिले आहेत
● सरकार चालवतांना आमची जबाबदारी असते न्यायाने वागणे, पण मागील काही महिन्यात एकूण गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे.
● तपास हा झालाच पाहिजे. पण हा तपास नि:पक्षपातीपणाने केला गेला पाहिजे. जर कुणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कुणी दोषी असेल, तर तो कोणी कितीही मोठा असला, तर त्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. अशी या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे.
● आज संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, केवळ राजीनामा घेणं, हातात काही पुरावे असोत नसो गुन्हा दाखल करून मोकळं होणं म्हणजे कुणाला न्याय देणं असं होत नाही.
