“….विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही….” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर, ४: नागपुरात आज विधिमंडळाच्या कायमस्वरुपी कक्षाचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. नागपूर करारामुळे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेणे ही अपरिहार्यता आहे. मात्र आता स्थापन झालेल्या कक्षामुळे येथे वर्षभर काम सुरू राहणार आहे. त्यामुळे अधिवेशन अपरिहार्य असले तरी त्यामागची औपचारिकता राहणार नाही. कोरोनासारख्या प्रतिकूल कालावधीतही महाराष्ट्र थांबला नाही. या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र कधी थांबणार नाही. हा संदेश दिला गेला आहे. प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी टाकलेले हे पुढचे पाऊल आहे. विदर्भाचे प्रश्न केवळ हिवाळी अधिवेशनापुरतेच मर्यादित न राहता त्यांना सदैव न्याय मिळावा हा यामागील उद्देश आहे. विदर्भ आपल्या हृदयात असून या नव्या निर्णयामुळे हे नाते आणखी घट्ट झाले असून भविष्यात विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुंबई येथून शुभेच्छा संदेश देताना नवीन कक्ष शासन आणि विदर्भातील जनता यामधील दुवा म्हणून काम करेल, असे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या विधानमंडळाची उच्च परंपरा असून त्याला एक नैतिक अधिष्ठान आहे. या नव्या कक्षातून सामान्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
