शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून शिंदे गटावर घणाघात
मुंबई, दि. ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा सांगितला. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची ठाकरे की शिंदे? याचा वाद निवडणूक आयोगसमोर सुरु आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय शनिवारी दिला. यावरून आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.
“४० डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं. गोठलेल्या रक्ताची माणसेच अशी कृत्य करतात. उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे. ज्या शिवसेनेने मोठे केल, तिचाच घात करण्यात आला. धनुष्यबाण गोठवल्याचा आनंद महाशक्तीला आता खूप होत असेल,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, “त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्याचसोबत ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तीन नावेही निवडणूक आयोगाला सुचवण्यात आली आहेत,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणाने राहिलं पाहिजे. शनिवारी शिवसेनेकडून नावे आणि चिन्हे सादर केली आहेत. अंधेरीची पोटनिवडणूक लागली असून, चार दिवसांत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर एक चिन्ह आणि एक नाव द्या. निवडणूक आयोगाने शिवसेनेने दिलेली तीन चिन्ह आणि तीन नावे जनतेला सांगितली आहेत. मात्र, शिंदे गटाने काय सादर केलं, याची माहिती दिली नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
