उत्तर भारतीय मेळाव्यात अनेक विषयांवर केले भाष्य
मुंबई, दि.१२: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी-अमराठी भेदाच्या भिंती तोडत आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केलं. गोरेगाव इथं आयोजित उत्तर भारतीय मेळाव्यात उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवण्याचं आव्हान ठाकरे यांनी केलं. याच मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणावर टीका करत ते ब्रिटिशांचं तोडा-फोडा आणि राज्य करा या नितीचा अवलंब भाजपनं केल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आज ज्या प्रकारे ते हिंदुत्वाचं प्रचार करत आहेत ते खरं हिंदुत्व नसल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ते म्हणाले की, “अलीकडे पंतप्रधान मोदींनी बोहरा मुस्लीम समाजाच्या कार्यक्रमाला भेट दिली. तेथील किचनमध्ये मोदींजींनी पोळी भाजली. हेच मी केलं असतं, तर हिंदुत्व सोडलं बोलले असते. त्यांचं मन मोठं आणि आमचं? त्यामुळे बघण्याची पद्धत बदलली पाहिजे. त्यांनी केलं तर माफ आणि आम्ही केलं तर गुन्हा.”
