उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
मुंबई, दि. १७: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी देशभरातील शिवसैनिकांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर येत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही सेना नेत्यांच्या सोबत स्मृतिथळी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली व माध्यमांना ही संबोधित केले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आपण राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मी अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगतोय की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतीव प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहेच. कोणी कितीही म्हटलं तरी पुसता येणार नाही. ज्यांचा स्वातंत्र्यालढ्याशी सूतराम संबंध नाही अशा मातृसंस्थेच्या मुलांनी, पिल्लांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळी होता, पण स्वातंत्र्यलढ्यापासून ते चार हात लांब होते, त्यांना स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा हक्क नाही, त्यांनी त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करु नये. ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्या धोक्यात आल्यानंतर ते अबाधित राखण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. पहिल्यांदा आपल्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय हे सांगावं मग आम्हाला प्रश्न विचारावे. दुसरी गोष्ट भारतरत्न देण्याच अधिकार हा पूर्णपणे पंतप्रधानांचा आहे. आठ वर्षांत स्वातंत्र्यवीरांना तु्म्ही भारतरत्न का दिला नाही? आधी स्वातंत्र्यवीरांसारखं वागायला शिका. पाकिस्तान घ्यायचा हा भाग वेगळा, परंतु पाकव्याप्त काश्मीरमधली एक इंच जमीन सुद्धा आणलेली नाही. तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न विचारण्याचं धाडस करु नये.”
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कालच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिथळी भेट दिली होती.
