खोपटे नवनगर अधीसूचित क्षेत्राला (प्रकल्पाला) उरणमधील ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध
उरण, दि.२९(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रासाठी ३२ गावे (रायगड जिल्ह्याच्या पनवेल तहसीलची ७ गावे आणि उरण तहसीलची २५ गावे) विकसित करण्यासाठी सिडकोने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नैना प्राधिकरनाची नेमणूक केली आहे. त्यानुसार सर्वसमावेशक व उत्तम दर्जाची सोयी-सुविधांनी परिपूर्ण विकास करण्यासाठी खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रातील ३२ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा सिडकोच्या नैना प्राधिकरनाने जाहीर केला आहे. मात्र त्यास उरण मधील सर्व शेतकऱ्यांचा, ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. याचाच एक भाग म्हणून सुमारे चार हजार वैयक्तिक हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी दोन ते तीन हजार हरकती दाखल झालेल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेत याबाबत विरोध करून तसे ठरावही घेण्यात आले आहेत. प्रत्येक गावात, प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये जनजागृती सुरु आहे.
काल दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी कोप्रोलीच्या सरपंच अलका म्हात्रे, उपसरपंच विपूल म्हात्रे, आवरेच्या सरपंच निराबाई पाटील, सरपंच केळवणे संदिप घरत यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रूपेश पाटील, गुरूनाथ गावंड, विश्वनाथ म्हात्रे, अनिल म्हात्रे, चंद्रशेखर ठाकूर, रोशन पाटील, प्रकाश पाटील, कुलदीप नाईक, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, पंकज ठाकूर, कोप्रोली, आवरे, कळंबूसरे, केळवणे या ग्रामपंचायतींसह पाणदिवेचे ग्रामस्थ आदींनी प्रांजली केणे-सिडको मुख्य नियोजनकार (नैना) बेलापूर, नवी मुंबई यांच्या कार्यालयात जाऊन खोपटे नवनगर प्रकल्पास विरोध म्हणून सुमारे चार हजार वैयक्तिक हरकती जमा केल्या आहेत.
सिडकोने ९५ गावातील जमिनी संपादित करून त्यांना भूमिहीन केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी गावांचे विस्थापन केलं. आजही त्यांचे योग्यरीतीने पुनर्वसन झालं नाही. प्रकल्पाच्या नावाने संपादित जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम सिडको करत आहे. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते न सोडवता त्यांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. सिडको किंवा तिचेच अपत्य असलेल्या नैनाने उरण-पनवेल मधील शेतकऱ्यांच्या आपल्या उदरनिर्वाहासाठी राखून ठेवलेल्या जमिनींचे नियोजन करण्याची गरज नाही. वेळ पडली तर इथला शेतकरी सिडकोचे दुकान बंद करायला मागे पुढे पाहणार नाही. सिडको नैनाच्या विरोधात इथला शेतकरी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहे. इथला शेतकऱ्यांनी याआधी रिलायन्ससारख्या बड्या भांडवलंदाराला पाणी दाखवलं आहे.
– रूपेश पाटील
सामाजिक कार्यकर्ते, उरण
