उरण एज्यूकेशन संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार
उरण, (विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील उरण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज या संस्थेच्या विरोधात पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. या संस्थेच्या विरोधात पालक-शिक्षक संघाने शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करूनही या शिक्षण संस्थेने शासनाच्या व न्यायालयांच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत आपला मनमानी कारभार चालूच ठेवला आहे. अखेर त्रस्त पालकवर्गाने संस्थेच्या मनमानी व भ्रष्ट कारभराविरोधात आवाज उठवत पालक-शिक्षक संघाने उरण एज्यूकेशन शिक्षण संस्था (युईएस) विरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी उरण पोलीस ठाण्यात केली आहे.
कोरोना काळात माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निकालामध्ये व शासन निर्णयामध्ये फी अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे निकालपत्र अडविता येणार नाही तसेच ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही. असे सूचित केले असतानाही उरण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजने ४५ हुन अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. तसेच ठरलेल्या शासन निर्णयापेक्षा जास्त फी विद्यार्थ्यांकडून वसूल केली जात आहे. यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पालकांनी तसेच पालक शिक्षक संघाने वारंवार विनंती करूनही निकालपत्र दिले गेले नाही. तसेच नियमबाह्यरित्या फी वसूल केली जात आहे. याविरोधात पालकांनी पंचायत समिती, उरण व शिक्षण विभाग येथे वारंवार लेखी तक्रार करूनही सदर शिक्षण संस्थेवर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे अखेरचा मार्ग म्हणून पालक-शिक्षक संघाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून उरण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या भ्रष्ट व मनमानी कारभारा विरोधात आवाज उठवत सदर शिक्षण संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना न्याय मिळणेकरिता उरण एज्यूकेशन संस्था (UES )च्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
