KTPL कपंनीच्या विरोधात आगरी कोंढरी ग्रामस्थांचे गेट बंद आंदोलन
उरण, दि.२३(विठ्ठल ममताबादे): आगरी कोंढरी पाडयातील शेतकरी ग्रामस्थांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात KTPL कपंनीच्या विरोधात आगरी कोंढरी पाड्यातील बाधित ग्रामस्थ शेतकरी व मच्छीमारांतर्फे करंजा टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड(KTPL) कंपनीच्या गेट समोर उद्या दि. २३/३/२०२२ रोजी सकाळी ९ वा. गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
उरण तालुक्यातील करंजा येथील आगरी कोंढरी पाड्यातील शेतकरी ग्रामस्थांच्या जमिनीचा वापर करून करंजा टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड (KTPL) ही कंपनी उभारण्यात आली. आगरी कोंढरी ग्रामस्थ मंडळ व KTPL कंपनी यांच्यात ९ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या करारातील एकाही अटीची पूर्तता अद्यापही झाली नाही. ज्याच्यामुळे भरपूर प्रमाणात सुशिक्षित वर्ग बेरोजगारीकडे वळला आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. तसेच KTPL कंपनीने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत स्थानिक नागरिकांवर शेतकरी, मच्छिमारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अशा प्रकारे बाधित शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या मागण्या कंपनी व सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी KTPL कंपनी विरुद्ध गेट बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
