फोटो प्रतीनिधिक आहे
उरण तालुक्यातील वशेणी येथे आगीत घर भस्मसात झाल्यामुळे गावंड कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज
उरण, दि.२२(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील वशेणी गावातील समीर रामकृष्ण गावंड व कुंजवी रामकृष्ण गावंड यांच्या राहत्या घराला रविवार दि. २०/२/२०२२ रोजी संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. गावंड यांच्या संसाराची, स्वप्नांची राख रांगोळी झाली. दहा लाखाहून अधिक मुल्ल्याच्या मालमत्तेचे नुकसान गावंड कुटुंबियांचे झाले. आगीमुळे राहते घरच जळून खाक झाल्याने गावंड कुटुंबियांवर भलेमोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दुर्दैवाने खूप मोठी घटना घडली. सुदैवाने या आगीमुळे कोणतेही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले मात्र घरातील सर्व सामान जळून खाक झाले.

संकटात सापडलेल्या व्यक्तीला, कुटुंबाला मदत करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी तथा विद्यमान पंचायत समिती सभापतीचे समिधा म्हात्रे यांनी १०,००० रुपयांची, काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी १०,००० रुपयांची तर पिरकोन येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून ५,००० रुपये व मुलांना कपडे दिले. या सर्वांनी आपल्यापरीने गावंड कुटुंबियांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली. गावंड कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांना आधाराची मोठी गरज असल्याने अनेक सामाजिक संस्था, संघटना, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने गावंड कुटुंबियांना मदत करीत आहेत. आगीमुळे अख्खे संसार घर दार उघड्यावर आलेल्या गावंड कुटुंबियांना मदत करावयाची असल्यास त्यांनी समीर रामकृष्ण गावंड फोन नंबर 9594589948 वर संपर्क साधावा. शिवाय गुगल पे /फोन पे नंबर 9594589948 या नंबरवर पैसे पाठवून जमेल तशी आर्थिक मदत करावी; असे आवाहन विविध सामाजिक संस्था, संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
