उरण तालुक्यातील नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा पुनर्वसन समस्ये संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट
उरण, दि.२२(विठ्ठल ममताबादे): उरण येथील नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाबाबत केंद्रीय जल परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत परिवहन भवन, दिल्ली येथे बैठक संपन्न झाली.
१९ जुलै २०१८ रोजी बैठक घेऊन JNPT ने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे त्यास मंजुरी द्यावी, गावांचा एकत्रीत विकास करावा तसेच नवीन शेवा गावच्या ३६१ तसेच हनुमान कोळीवाडा गावच्या २५६ घरांचे पुर्नवसन करावे, वाढीव विकसित भूखंड ठरल्या प्रमाणे देण्यात यावेत आदि मागण्या केल्या.
सदर बाबत गावांचे पुनर्वसन करताना सर्व नागरी सुविधा विकसित करून द्याव्यात, सर्वोत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, घरांसाठी देण्यात येणाऱ्या प्लॉटना स्ट्रीट रोड, स्ट्रीट लाईट व प्लॉट समोर मोकळी जमीन असावी, तसेच समाजमंदिर, देवालय व गावांचे पारंपरिक सण व उत्सव साजरे करण्यासाठी आवश्यक तेवढी जमीन देण्यात यावी अशी मागणी खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी केंद्रीय मंत्री महोदयांकडे केली आहे.
या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व सद्य परिस्थितीची मंत्री महोदयांना महिती देण्यात आली, या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे मंत्री महोदयांनी सुचित केले. खासदार व त्यांच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीमुळे पुनर्वसन व दोन्ही गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होत आहे. यावेळी कामगार नेते महेंद्र सावंत, करंजा मच्छिमार सहकारी सोसायटी संचालक हेमंत गौरीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
