युक्रेनमधून दोनेस्क आणि लुहांस्क हे दोन प्रांत फुटून स्वतंत्र झाल्याची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची घोषणा
दोनेस्क आणि लुहांस्क हे दोन प्रांत युक्रेनमधून फुटून स्वतंत्र झाल्याची द्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फिरवली आहे. या प्रांतांच्या स्वायत्ततेला मान्यता देत असून तिथं शांतता राखण्याच्या दृष्टीनं रशियन फौजा रवाना करणार असल्याचं त्यांनी काल दूरचित्रवाणीवरुन देशाला संबोधित करताना सांगितलं.
या हूकूमनाम्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याची माहिती पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलताना दिली होती आणि त्यावर त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली होती असं रशियाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
रशियाच्या या कृतीचा अर्थ युक्रेनवर आक्रमण असा लावायचा की नाही याबाबत अमेरिका आणि युरोपीय देशांनी स्पष्ट संकेत दिलेले नाहीत मात्र या घटनेचा तीव्र निषेध केला असून नवीन आर्थिक निर्बंध रशियावर लावण्याची घोषणा केली आहे.
Source-AIR
