“रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ” – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि २१ : रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
उद्योग विभागाच्यावतीने देण्यात येणारे ‘उद्योगरत्न’, ‘उद्योग मित्र’, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन राज्यपाल बैस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांच्यावतीने टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला. टाटा यांना काल उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना, उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

यावेळी राज्यपाल बैस यांनी महत्त्वाचे ‘उद्योग पुरस्कार’ सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभागाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तरुण राष्ट्र म्हणून भारताला आज अभूतपूर्व अशी संधी आहे. जगातील अनेक विकसित देश त्यांच्या कामगारांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राने कौशल्य विकास आणि उद्योजकतेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या पुढील २५ वर्षांच्या औद्योगिक विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी, उद्योगपती आणि विविध चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रमुखांची उच्चाधिकार समिती स्थापन करावी, अशी सूचना त्यांनी केली.

आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली सीरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशील्ड’ ही लस विकसित करून देशाचा नावलौकिक केला आहे. किर्लोस्कर हे उद्योगक्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. गौरी किर्लोस्कर यांना देण्यात येणारा ‘उद्योगिनी’ पुरस्कार सर्व महिला उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना दिला जाणारा मराठी उद्योजक पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा पुरस्कार आहे, असे राज्यपाल बैस यांनी यावेळी नमूद केले.
