ही इटली नाही हा हिंदुस्थान आहे – उद्धव ठाकरे
रायगड: “युतीबाबत आम्हाला विचारताना लाज वाटते का? त्यापेक्षा शरद पवारांना विचारा. सर्वप्रथम वसंतरावांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद स्थापन करून मुख्यमंत्री झाले. तुम्ही गद्दारी केलीत. मग सोनिया गांधी विदेशी वाटल्या म्हणून बाहेर पडलात आणि पुन्हा काँग्रेससोबत गेलात.” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडून टीका केली. रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांची प्रचारसभा गुहागर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात युतीची घोषणा झाल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या संघर्ष यात्रेच्या गाड्या पंक्चर झाल्या आहेत. युतीमध्ये जादू आहे. युतीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत.
या निवडणुकीत देश हिताचा विचार करून भाजपसोबत युतीची घोषणा केली. यामुळे विरोधकांच्या कानठळ्या बसल्या आहेत. अनंत गिते यांची निवड बाळासाहेबांनी केली. तेव्हापासून ते विजयी होत आले आहेत. सहा सहा वेळा जनतेने त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. यावरून त्यांच्यावरील जनतेचा अतुट विश्वास दिसून येतो. बाळासाहेबांचा हाच विश्वास पुढे नेत उद्धव ठाकरे यांनी देखील गिते यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.
इथे येताना वारकरी बांधवांनी माझे स्वागत केले हा शुभशकून आहे. तुम्ही वारकरी भगवा घेऊन पंढरपूरला जाता, आमचे वारकरी भगवा खांद्यावर घेऊन दिल्लीत जातात. आम्ही अन्यायविरोधात दगडधोंडे हाती घेतो. मच्छिमारांचा विषय आम्ही मार्गी लावला. केंद्र सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा केला. सर्व नेते प्रचारात असताना कोकणातील मच्छिमारांचे प्रश्न मार्गी लावले. जनतेचा विश्वास गमावू नको, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता. प्राण गेला तरी बेहत्तर पंरतु शब्द पडू दिला नाही, असे देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
ही इटली नाही हा हिंदुस्थान आहे
देशद्रोहाचे कलम काढून टाकणार, सैन्याला दिलेला विशेषाधिकार काढून घेणार मग तिकडे सैनिकांनी करायचे काय असा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधीचा यावेळी खरपूस समाचार घेतला. आम्ही सैनिकांना बंदुका देऊ आणि गोळय़ा काढून घेऊ इतकेच राहुल गांधी बोलायचे बाकी आहेत, असे सांगतानाच राहुल गांधी… ही इटली नाही हा हिंदुस्थान आहे’ असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. अशा नपुंसक औलादीच्या ताब्यात देश द्याल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थिताना विचारला.
माझा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. युतीच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना टेन्शन देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची आज लक्तरे काढली.
शिवसेना भाजपची २५ वर्षांपासून युती आहे आणि ती अशीच मजबूत राहणार. निवडणूकीच्या काळात राममंदिराचा विषय थंड पडला होता. कोर्टाने देखील कालमर्यादा ठरवून द्यावी. त्यामुळं लवकरच मंदिराच्या कामकाजाला गती येईल, त्याचप्रमाणे कोकणात प्रदूषणककारी प्रकल्प येणार नाहीत, त्याला शिवसेनेचा यापुढेही कायम विरोध राहील. असा विश्वास देखील त्यांनी गुहागरवासीयांना दिला.
