राष्ट्रवादीच्या काँग्रेस मधील विलीनीकरणावर उदयनराजे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
अहमदनगर/मुंबई: गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर वेगळ्याच राजकीय चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेस चे काँग्रेस मध्ये विलीनीकरण करण्याबाबत सध्या सगळीकडे चर्चा चालू आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांची मुंबईत बैठक चालू आहे. बैठकीत विलीनीकरणाच्या बाबत काही चर्चा होते का ते पाहणे महत्वाचे ठरेल.
विलीनीकरणाच्या चर्चेचा धागा पकडून काल अहमदनगर मधील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी छेडलं. तेव्हा उदयनराजे म्हणाले की राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेबाबत मला काहीच माहीत नाही. जर विलीनीकरण करायचं असेल तर या बाबत माझ्याबरोबर तसंच इतर नेत्यांसोबत चर्चा होणं गरजेचं आहे. पुढे ते असेही म्हणाले की जर विलीनीकरण करायचे असेल तर ते कोणत्या पक्षात करावे आणि का करावे याबाबत चर्चा होणंही तितकंच गरजेचं आहे.
आज खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीला उपस्थित होते पण काही वेळापूर्वी ते बैठक अर्धवट सोडून एका वैयक्तिक कामानिमित्त बाहेर पडले आहेत. आजही पत्रकारांनी राष्ट्रवादी च्या काँग्रेस मधील विलीनीकरणाबाबत त्यांना छेडले असता त्यांनी हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे सांगितले.
