तूर आणि उडीद डाळीच्या साठेबाजीला केंद्र सरकारकडून मर्यादा
मुंबई, दि. 3: तूर आणि उडीद डाळीच्या साठेबाजीला केंद्र सरकारकडून मर्यादा देशात तूर आणि उडीद डाळीच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारने विविध स्तरांवर या डाळींच्या साठ्यांवर मर्यादा लावणारी अधिसूचना जारी केली असून ती कालपासून तात्काळ लागू झाली आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत साठ्याची ही मर्यादा लागू राहील, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.
किरकोळ व्यापाऱ्यांना ५ मेट्रीक टन, घाऊक व्यापाऱ्यांना २०० मेट्रीक टन, मोठ्या धान्यपुरवठा साखळ्यांना प्रत्येक दुकानात ५ मेट्रीक टन, तर मोठ्या गोदामात २०० मेट्रीक टन पर्यंतच डाळींचा साठा ठेवता येईल. डाळींच्या मिल आणि आयातदारांवरही साठ्याचे निर्बंध लागू झाले आहेत. या सर्वांनी आपल्याजवळच्या साठ्याचा तपशील केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने उपलब्ध करुन दिलेल्या पोर्टलवर द्यायचा आहे.
