thane palghar patsanstha
ठाणे, पालघर जिल्हा विद्या सेवक पतसंस्थेतर्फे पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांना मोलाची मदत
एक कदम उठाओ
किसी की मदद के लिए
उस दिन तुम जीत जाओगे
उस दिन तुम्हारे अंदर की इंसानियत जीत जाएगी ….
अगदी या हिंदी कवितेच्या ओळींप्रमाणेच एक पाऊल मदतीच्या दिशेने टाकत समाजात नवा पायंडा निर्माण करण्याचं काम ठाणे, पालघर जिल्हा विद्या सेवक या पतसंस्थाने केले आहे. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे सी.आर.पी.एफ.च्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. देशभरातून या हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला. एरवी जातीजातीत आणि धर्माच्या भिंतींत विभागलेल्या भारतीयांनी आपल्या दातृत्वाचे या वेळी दाखवले. याच हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरांमध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संजयसिंह राजपूत या दोन वीरपुत्रांचा समावेश होता. या दोन्ही शहीद जवानांच्या बुलढाणातील मूळगावी जात त्यांना आदरांजली वाहत तसेच दोन्ही वीरपुत्रांच्या कुटुंबाला उत्स्फूर्त आर्थिक मदत व मुलांना नवीन कपडे भेट देत ठाणे, पालघर जिल्हा विद्या सेवक पतसंस्थेने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
“शहीद जवानांच्या वीरमाता-पिता, वीरपत्नींचा त्याग मोठा असून, त्यांच्या धैर्याला आमचा सलाम आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी असून, त्यांच्या या दुःखात ठाणे, पालघर जिल्हा विद्या सेवक पतसंस्था सहभागी आहे”, असे ठाणे, पालघर जिल्हा विद्या सेवक पतसंस्थेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
ही पतसंस्था शिक्षक व शिक्षकेत कर्मचाऱ्यांची पगारदार पतसंस्था आहे. ठाणे, पालघर जिल्हा विद्या सेवक पतसंस्थेचे जिल्ह्यात एकूण ७५०० शिक्षक सभासद आहेत. या पतसंस्थेच्या एकूण आठ शाखा आहेत, या पतसंस्थेची मुख्य शाखा कल्याण शहरात आहे. याप्रसंगी ठाणे, पालघर जिल्हा विद्या सेवक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीर घागस, संचालक समिती प्रमुख श्री. गुलाबराव पाटील, कार्यवाह श्री. रमेश बुटेरे, व्यवस्थापक श्री. चंद्रशेखर बागुल, नाईक श्री. रविद्र हिंगमिरे यांच्यासह मलकापूर व लोणार गावचे ग्रामस्थ देखील यावेळी उपस्थित होते.
