Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने प्रस्ताव केंद्र शासनाकडे

“पाणथळाच्या संरक्षणाबरोबर पर्यटन वाढीस चालना मिळेल” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १७ : ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ जागेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळताना जागतिक पर्यटन नकाशावरदेखील याची नोंद होईल  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ९ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या चौथ्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

ठाणे खाडी

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौ.कि.मी क्षेत्रावर पसलेले आहे. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या पर्यावरणाबाबत महत्त्व असलेल्या क्षेत्रांना रामसर क्षेत्र असे म्हटले जाते. ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी-प्रजाती आढळतात. त्यामुळे या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. ठाणे खाडीच्या अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित असून त्यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित  ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे. ठाणे खाडी परिसर रामसर क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर फ्लेमिंगोसह  विविध पक्षी व प्रजातींचे अधिक संवर्धन होण्यास मदत मिळेल.

महाराष्ट्रातील रामसर स्थळे

पाणथळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील “नांदूर मधमेश्वर”अभयारण्यास जानेवारी २०२० मध्ये रामसर स्थळाचा दर्जा दिला गेला. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये घोषित झालेले बुलडाण्यातील “लोणार”सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे. यानंतर ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यास महाराष्ट्रातील हे तिसरे रामसर स्थळ होईल….

रामसर दर्जा म्हणजे काय ?

१९७१ मध्ये इराणमधील रामसर शहरात “रामसर परिषद” झाली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिकदृष्टीने महत्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना “रामसर स्थळ” घोषित करण्याचे निश्चित करण्यात आले. पाणथळ जागेच्या कक्षेत  सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्र किनारे, भातखाचरे, इ. जागांचा समावेश करण्यात आला.

जगात २४२४ पाणथळांना रामसर स्थळे

भारताने “रामसर” करारावर १९८२ मध्ये स्वाक्षरी करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील २४२४ पाणथळांना “रामसर” स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. यात भारतातील ४९ स्थळांना “रामसर स्थळा”चा दर्जा मिळाला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *