‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आरोग्य तपासणी मोहिमेमुळे राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत
मुंबई, दि.१: राज्यातील सर्व कुटुंबाचे दोन फेऱ्यांमध्ये आरोग्य सर्वेक्षण करणारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही देशातील अभिनव आरोग्य तपासणी मोहीम राज्यात राबविण्यात आली. या मोहिमेमुळे राज्यातील कोविड संसर्ग रुग्ण सापडण्याबरोबरच राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत झाल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.
आजपासून विधानमंडळाच्या २०२१ या वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. तत्पूर्वी राज्यपाल विधानभवनात आल्यानंतर त्यांचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यानंतर राज्यपाल महोदयांना मानवंदना देण्यात आली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मराठीतून संपूर्ण अभिभाषण केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नरही झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि आमदार उपस्थित होते.
राज्यपाल आपल्या अभिभाषणात म्हणाले की, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत राज्यातील अतिजोखमीच्या व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांचे विशेष सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे. राज्यात कोविडचा धोका अजूनही टळलेला नसून आता कोविडशी मुकाबला करण्यासाठी राज्य शासनामार्फत “मी जबाबदार” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने कोविडचे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्या अन्य राज्यांसाठी आणि अन्य देशांसाठी आदर्श ठरल्या आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी करून आणि धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये यशस्वीपणे कामगिरी करून राज्याने या साथ रोगाचे अत्यंत प्रभावी व्यवस्थापन केले आहे.
येणाऱ्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता आपण सर्वांनीच सुरक्षित अंतराचे पालन करण्याची, मास्क वापर करण्याची आणि नियमितपणे हात धुण्याची तीव्र गरज आहे असेही ते पुढे म्हणाले.
