महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतरच्या घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती गठित
मुंबई, दि. २० : नवी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. विरोधीपक्ष व माध्यमांच्या वाढत्या दबावामुळे अखेर शासनाला देखावा म्हणून का असेना काहीतरी कारवाई करणे गरजेचे होते.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती घटनेच्या तपासाअंती एका महिन्यात अहवाल सादर करणार आहे. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी-दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे.
