Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“लवचिकता, कणखरपणा व आत्मविश्वास वाढीसाठी सूर्यनमस्कार सर्वांगी सुंदर” – विवेकानंद केंद्राचे संचालक चितापुरे यांचे प्रतिपादन

योग व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा सोलापूरमध्ये समारोप

सोलापूर, दि. १५: सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर असा प्रकार आहे. ज्यांना सकाळी स्वतःसाठी जास्त वेळ मिळत नाही, त्यांनी बीजमंत्रा सहित व श्वास प्रश्वास यासह नियमित फक्त १३ सूर्यनमस्कार घातले तर त्यामध्ये आसन, प्राणायाम, मंत्रशास्त्र व ध्यान या गोष्टी साध्य होतात, तेही फक्त वीस मिनिटात. शरीराची लवचिकता, मनाचा कणखरपणा, आत्मविश्वास वाढीस लागतो. दहा किंवा बारा आसनाची साखळी असलेला सूर्यनमस्कार सर्वांसाठी महत्त्वाचा योगाभ्यास आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात त्याचा कायमस्वरूपी अवलंब करावा, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र, जुळे, सोलापूरचे संचालक नंदकुमार चितापुरे यांनी केले.

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूर व विवेकानंद केंद्र, जुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लहान बालकांसाठी योग व व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

योग एक जीवन पद्धती आहे. आपल्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी योगाची नितांत आवश्यकता आहे. योग ही सार्थक व आनंदी जीवन जगण्याची कला आहे, असे चितापुरे यांनी यावेळी सांगितले. ‘योगशास्त्रातील ज्ञान हे लहान मुलांनाही समजले पाहिजे, अशा रीतीने त्याची मांडणी करणे, हा माझ्या जीवनाचा हेतू आहे’ असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते, अशी आठवण चितापुरे यांनी करून दिली.

विवेकानंद केंद्र नगर सोलापूर व नगर जुळे सोलापूर येथे सर्व महिला व पुरुष यांच्यासाठी रोज सकाळी 6 ते 7 या वेळेत मोफत योगवर्ग सातत्याने चालू आहेत. सध्या सोलापूर नगराचे आयोजन रवि कंटली यांच्या मार्गर्शनाखाली 165 रेल्वे लाईन, बालाजी मंदिर सभागृह, पश्चिम मंगळवार पेठ, यंत्रमाग धारक संघ एमआयडीसी, होटगी महाराज मठ, शेळगी येथे असून जुळे, सोलापूर परिसरात दिपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही के वयम्, बाॕम्बेपार्क जवळ, इंडस्ट्रियल इस्टेट सभागृह, होटगी रोड, चैतन्य नगर, संत सेवा वाचनालय, विजयापूर रोड व हत्तुरे वस्ती, विमानतळाजवळ संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत महिलांसाठी नियमित योगवर्ग चालू आहेत, अशी माहिती चितापुरे यांनी यावेळी दिली.

लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी त्यांना योग, संस्कृती तसेच सभ्यता याविषयी माहिती पोहोचवण्यासाठीचे विवेकानंद केंद्राचे व्यक्तिमत्व विकास शिबिर अत्यंत कौतुकास्पद आहे. 21 जूनला होणाऱ्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन देखील केंद्रिय संचार ब्युरोतर्फे करण्यात आले.

योगशिक्षक ओंकार औरसंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे 21 सूर्यनमस्काराचे सराव करून घेतले.

नेहा हबीब, वैष्णवी बेले, श्रुती सगरी, शौर्य नवले, शतराज सुरवसे, धोंडीराज जाधव, वेदांत क्षिरसागर, वेदा पाठक, संस्कृती गवंडी आणि अंशुल मिरजकर या उत्कृष्ट सूर्यनमस्कार घातलेल्या दहा विद्यार्थ्याना ‘सरदार पटेल सचित्र जीवनगाथा’ हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वरूपात देण्यात आले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *