येत्या रविवारी देशभरातील सर्व सरकारी बँका सुरु राहणार
नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ मार्च येत्या रविवारी येत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने कामकाजासाठी देवाण-घेवाण करणाऱ्या देशभरातील सर्व सरकारी बँका रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक परिपत्रकही जाहीर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहारांसाठी ३१ मार्च २०१९ रोजी सरकारी बँकांची सर्व पे अँड अकाऊंड कार्यालये खुली राहतील. त्यामुळे सर्व सरकारी बँकांना सूचना देण्यात येते की, त्यांनी आपल्या सर्व शाखा रविवारी (३१ मार्च) खुल्या ठेवाव्यात.
सरकारी बँकांच्या सर्व शाखा ३० मार्च २०१९ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. तसेच RTGS आणि NEFT सहित इलेक्ट्रॉनिक देवाण-घेवाणही ३० आणि ३१ मार्च रोजी वाढवण्यात आलेल्या वेळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय.
