संजय राऊत शिंदे-फडणवीस सरकारला म्हणाले ढोंगी सरकार
मुंबई, दि. १५ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याआधी औरंगाबाद व उस्मानाबाद चे नामांतर अनुक्रमे संभाजीनगर व धाराशिव करण्याचा तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णयाला आज शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
सदर निर्णय रद्द केल्यामुळे औरंगाबाद व विशेषतः नवी मुंबई, रायगड-ठाणे आदी भागातील प्रकल्पग्रस्त पुन्हा आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी त्यांना शिवसेनेची साथ लाभू शकते असे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी घेतलेला हा नामांतराचा निर्णय रद्द केल्यामुळे शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी केंद्राची पर्वा न करता, इतर कोणाचीही पर्वा न करता, हिमतीनं एका हिंदुत्ववादी भूमिकेतून, लोकभावानेचा आदर म्हणून औरंगाबाद चं संभाजीनगर, उस्मानाबाद चं धाराशिव असं नामांतर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. आणि जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारनं या निर्णयांना स्थगिती दिली असेल, तर त्यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचाय. एवढंच मी सांगतोय.” ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देऊन काय साध्य केलं? हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा असेही त्यांनी माध्यमांसमोर सांगितले.
