संभाजीनगर व धाराशिव नामांतराच्या ठाकरे सरकारच्या निर्णयालाही स्थगिती
मुंबई, दि. १५ : राज्यात शिंदें-फडणवीस सरकार सत्तेत आल्याआल्याचं त्यांनी आधीच्या ठाकरे सरकारचे निर्णय बदलण्यास सुरुवात केली. यात सर्वात आधी शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या मेट्रो – ३ कारशेड प्रकल्प पुन्हा आरे येथे हलवण्यापासून सुरवात झाली. परंतू, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याआधी औरंगाबाद व उस्मानाबाद चे नामांतर अनुक्रमे संभाजीनगर व धाराशिव करण्याचा तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने तडकाफडकी रद्द करत कुरघोडीचे राजकारण सुरू केल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत या तीनही नामांतरांना स्थगिती देण्यात आली आहे.
