फक्त आठवडाभर थांबा; रशियाची स्पुटनिक V भारतीय बाजारात येतेय
मुंबई/नवी दिल्ली, दि.१५: रशियातून आयात केलेली कोरोना विषाणूवरील ‘स्पुटनिक व्ही’ ही लस पुढील आठवड्यापासून देशभरातील बाजारांत उपलब्ध होणार असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी काल दिली. आयात केलेल्या स्पुटनिक लसीच्या एका मात्रेसाठी ९९५ रुपये ४० पैसे मोजावे लागणार आहेत. या लसीची परिणामकारकता ९१.६० टक्के असल्याचं सांगितलं जातं. डॉ. रेड्डीज, ही औषध निर्माण कंपनी रशियाची ही लस मेक इन इंडिया अंतर्गत भारतात बनवणार असून देशांतर्गत उत्पादन सुरू झाल्यावर या लसीची किंमत कमी होण्याची शक्यता कंपनीनं व्यक्त केली आहे.
दरम्यान केंद्रसरकार राज्य आणि केंद्र्शासित प्रदेशांना येत्या १५ दिवसात कोरोना लसींच्या एक कोटी ९१ लाख मात्रा पुरवणार आहे. राज्य सरकारांनी लसींचं वितरण योग्य आणि न्याय्य पद्धतीनं होत आहे याकडे लक्ष द्यावं तसंच लस वाया जाण्याचं प्रमाण कमीत कमी ठेवण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात असंही केंद्रानं सांगितलं आहे. ४५ आणि त्यापुढील वयोगटातील लोकांना तसंच आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी यांना व्यवस्थित लस मिळेल याचं नियोजन करता यावं यासाठी १५ दिवस आधी मोफत लसीच्या पुरवठ्याबाबत कल्पना दिली जात असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
